जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात अटक केलेल्या १२ संशयित आरोपींपैकी आज ९ संशयित आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्व संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सरकार पक्षाकडून ॲड. प्रवीण चव्हाण यांनी संशयितांना पोलीस कोठडी मिळावी म्हणून जोरदार युक्तीवाद केला.
बीएचआर घोटाळ्यात काल पहाटे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ संशयिताना ताब्यात घेतले होते. त्यातील अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोकटा या तिघांना पुणे न्यायालयात हजर केले असता या तिघांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
पुणे न्यायालयात संशयितांना हजर केल्यानंतर सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी तिघांना पोलिस कोठडी मिळावी म्हणून प्रभावी युक्तिवाद केला. ॲड. चव्हाण यांनी मुद्दे मांडले की, घोटाळा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या सर्व संशयित आरोपींनी 30 टक्क्याप्रमाणे पावत्या विकत घेतल्या. बीएचआर पतसंस्थेत विशिष्ट प्रकारे संगनमत करून घोटाळा करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी तीस टक्के प्रमाणे पावत्या विकत घेण्यासाठी परिस्थिती निर्माण केली. आणि यातून ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे सर्व संशयितांना पोलीस कोठडीत देण्यात यावी, अशी मागणी ॲड. प्रवीण चव्हाण यांनी केली. त्यावर न्यायालयाने तिघा आरोपींना 22 जून म्हणजेच पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सरकार पक्षाकडून ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी आजही जोरदार बाजू मांडली.