जळगाव (प्रतिनिधी) काही वेळासाठी बाहेर जावून येतो, असं सांगून घराबाहेर पडलेल्या बेपत्ता तरुणाची मोटारसायकल विदगाव तापी नदीजवळ आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणाने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे.
चंद्रकांत शांतारात मराठे (वय-३२, रा.शिवाजी नगर) हा तरुण २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आपली दुचाकी क्रमांक (एमएच १९, डब्ल्यू ५८७०) घेवून घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ झाल्याने मुलगा घरी आला नाही म्हणून त्याचे वडील शांताराम मराठे यांनी मोठा मुलगा प्रदिप व मुलगी कल्पना यांना याची माहिती दिली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी शांताराम मराठे यांनी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. परंतू विदगाव तापी पुलावर बेपत्ता झालेल्या चंद्रकांतची दुचाकी १ ऑक्टोबर रोजी आढळून आली. दुचाकी नदी जवळ लावलेली असल्यामुळे चंद्रकांतने उडी घेवून आत्महत्या केली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे चंद्रकांत मराठे याने दोन लोकांविरुद्ध तक्रार दिली होती. खोटे गुन्हे दाखल करण्याची चंद्रकांतला धमकी दिली जात होती. याच तणावातून त्याने काही बरेवाईट केले असल्याची भीती व्यक्त करण्यात आहे. दरम्यान, पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली आहे.