मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार 24 तासांमध्ये मुंबई आल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, मुख्यमंत्री २४ तासांत त्यांच्या भूमिकेबाबत असा यू-टर्न घेतील का, याबाबत मला साशंकता आहे, असे म्हटले आहे. ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कालच्या भाषणात उद्धव ठाकरे काही आमदारांच्या दबावाखाली असा निर्णय घेतील, असे मला वाटत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आहे की, नाही या बद्दल प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्र्यांकडे बहुमत राहीलेले नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे.