मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव जो आखला जातोय. त्याविषयी मी बोलणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की, माझ्याकडे उत्तर नाही.महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या.. मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेले कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेले राजकारण तसेच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अनेक लोकांना वाटतेय मिशन बिगिन अगेनमध्ये पुन्हा एकदा राजकारण केले जातं आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्या मी आज बोलणार नाही, मात्र त्यावर एक दिवस मी भाष्य करणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. तर सरकार मराठा समाजाच्या मताशी, भावनेशी सहमत आहे. त्यामुळे कृपया मोर्चे, आंदोलने करू नका. कोणीही गैरसमज पसरवू नका. सरकार दाद देत नसेल तर लढा उभारणे ठीक आहे. आता सरकार आपलेच आहे. सरकारने मराठा आरक्षणाची बाजू लावून धरली आहे. न्यायालयात लढाई सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाची गरज नाही. विरोधी पक्षनेत्यांशीही माझी चर्चा सुरू आहे. त्यांनीही पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाचं भीतीदायक चित्र आहे. ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. हे संकट वाढत आहे त्यामुळं आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’ पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.