जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लवकरच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन १५१ पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर भारतीताई सोनवणे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्याचे निर्देश शासनाकडून जारी करण्यात आले आहे. जळगाव शहरात मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आणि नियोजनाकामी महापौर भारतीताई सोनवणे यांनी सोमवारी दुपारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन लढ्ढा, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान, नगरसेवक विशाल त्रिपाठी, नवनाथ दारकुंडे, अतुल बारी आदी उपस्थित होते.
प्रत्येक घराला भेट देण्याचे उद्दिष्ट
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत शहरातील प्रत्येक घराला भेट देऊन कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. कोरोनाचा फैलाव होणार नाही यासाठी मोहीम १०० टक्के यशस्वी करणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे. मोहिमेसाठी शहरातील नगरसेवक, मान्यवर आणि, विविध सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी, असे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले.
नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करावी
शहरात मोहिमेसाठी १५१ पथक तयार करण्यात येणार आहे. पथकाकडून तपासणी केली जात असताना एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी जेणेकरून कोरोनाचे अचूक निदान होईल. एखाद्या व्यक्तीची चाचणी केल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल न करता गृह विलगीकरणात ठेवण्याची मुभा द्यावी. मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अँटीजन टेस्ट किट देखील मागविण्यात आल्या आहेत. मनपा प्रशासनाकडून चोख नियोजन सुरू असून मोहिमेचे दोन्ही टप्पे यशस्वी करण्यात येतील.
नागरिकांनी भीती बाळगू नये परंतु हलगर्जीपणा देखील करू नये
जळगावकर नागरिकांच्या मनात कोरोनाची असलेली भीती दूर झाली आहे ही चांगली बाब आहे परंतु अलीकडे लोक अधिकच बेपर्वा झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात आज अंदाजे १५% लोक मास्कचा वापर करत नाही. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, फिजीकल डिस्टनसिंगचे पालन करणे असे उपाय देखील सध्या अनेक नागरिक अवलंबत नाही. कोरोनाबाबत होत असलेला हलगर्जीपणा फार घातक असून नागरिकांनी स्वतःची आणि परिवाराची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत उपस्थितांनी व्यक्त केले.