नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो हमीभावाची व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल, अशा आशयाचे ट्वीट राज्यसभेत प्रचंड गदारोळात कृषि विषयक दोन विधेयके मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
राज्यसभेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन्ही विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. ही विधेयके संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या विधेयकामुळे शेतकऱ्यांची दलालांच्या तावडीतून सुटका होणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे जगणं अधिक सुखकर करू, असे मोदी यांनी म्हटले आहे.