मुंबई (वृत्तसंस्था) सोमवार दि. १२ ऑक्टोंबर रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,’ असे ट्विट उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला. लोकल सेवा ठप्प झाली. सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल रात्री उशिरा एक ट्विट करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात घातपात घडवण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा केंद्रातील सर्किट – २ चा वीजपुरवठा बंद पडल्यानं सोमवारी सकाळी १० वाजता मुंबईसह ठाणे, कल्याण व रायगड जिल्ह्यातील काही भागांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सोमवारी रात्रीचे साडेबारा वाजले. तर भांडुप आणि ठाणे परिसरात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला होता.