जळगाव (प्रतिनिधी) हिंदी मेरी माता, गुरू मेरा अभिमान है, राष्ट्र की तो अस्मिता का हिंदी ही तो शान है। डॉ.प्रियंका सोनी लिखित या ओळींनी आंतरराष्ट्रीय महिला कवी संमेलनाची सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस निमित्त आयोजित ऑनलाईन कवी संमेलनात देशभरातील महिला कवी सहभागी झाले होते.
डॉ.प्रियंका सोनी द्वारे संचालित हिंदी साहित्य गंगा संस्था आणि अमृतधारा फाउंडेशनद्वारे राजभाषा हिंदी दिवसनिमित्त ऑनलाईन कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कवी संमेलनाची विशेष बाब की कधीकाळी भारतात आलेल्या सध्या साऊथ आफ्रिका येथे वास्तव्यास असलेल्या जाहिदा बानो यांनी देखील सहभाग नोंदविला. इतकंच काय तर आपल्या तुटक भाषेत त्यांनी हिंदी कविता सादर केली. भारतात आल्यानंतर त्यांनी हिंदी भाषा शिकली. त्यांनी सांगितले की आफ्रिकन भाषा फार अवघड असून त्या तुलनेने हिंदी भाषा फार गोड आणि चांगली भाषा आहे. देश आणि हिंदी भाषेप्रति त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले.
ऑनलाईन संमेलनात जगभरातील ५० पेक्षा अधिक महिला कवी सहभागी झाले होते. सर्वांनी विविध कविता, शोधनिबंध, लेख सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून झासी येथील वरिष्ठ साहित्यिक निहालचंद्र शिवहरे या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदौरच्या वरिष्ठ साहित्यिक महिमा शुक्ला, प्रमुख अतिथी मालती सिसोदिया, पंजाबच्या साहित्यिका अमरजीत कौर यांच्या सानिध्यात कवी संमेलन पार पडले. हिंदीचा बोलबाला सर्वत्र व्हावा, हिंदीला विश्व भाषेचा दर्जा मिळावा या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रियंका सोनी यांनी तर आभार हरियाणा येथील अनिता पांचाल यांनी मानले. कार्यक्रमात डॉ.कुमुदवाला, डॉ.दिपीका राव, अनिता मंदिलवार, सुमित्रा गुप्ता, चारूमित्रा नागर, डॉ.शैलचंद्रा धमतरी, मधुबाला दुबे यांच्यासह अनेक महिला कवी सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप करण्यात आला.