नवी दिल्ली । देशातील कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर केंद्राच्या या निर्णयाचा सर्वच स्तरांवर विरोध होत आहे. सरकारच्या निर्णयामुळे काही संघटनांनी देशाच्या सीमा भागात कांद्याची निर्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेली असल्याने सीमाभागात कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने देशाच्या सीमावर्ती भागात अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीला विशेष परवानगी दिली आहे.
त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे. बांगलादेश आणि भारत यांच्या सीमावर्ती भागात पाच ट्रकमध्ये तब्बल 25,000 टन कांदा मागील काही दिवसांपासून पडून आहे. दरम्यान, हा कांदा निर्यात करण्यासाठी भारत सरकारने आज विशेष परवानगी दिली आहे, या विषयीची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या अगोदर स्थानिक व्यापाऱ्यांनी देशाच्या सीमेपर्यंत पोहचलेल्या कांद्याच्या निर्यातिची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यावर देशाच्या विविध बंदरांवर अडकलेल्या कांद्याने भरलेल्या ट्रक व कंटेनर यांना अंशत: विश्रांतीचा एक भाग म्हणून मंजुरी दिली जाऊ शकते, असे विदेश व्यापार महासंचालकांकडून सांगण्यात आले होते.