मुंबई (प्रतिनिधी) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं वैजनाथ वाघमारे कोण आहेत, अशी चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे लेकीचा फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांनी भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
आपल्या वादात लेकीलाही ओढल्याची खंत
विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात, तर पाच वर्षांपूर्वी विभक्त झालेली त्यांची पत्नी सुषमा अंधारे या ठाकरे गटात आहेत. त्यामुळं संघर्ष तर होणारचं ना, असं वैजनाथ वाघमारे म्हणतात. राजकारण म्हटलं की वाद आले…. प्रतिवाद आले… टीकाटिप्पणी आली… पण तेच राजकारण जेव्हा कौटुंबिक पातळीवर येऊन पोहोचतं तेव्हा त्याची धग जास्त जाणवते. सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी आज सकाळी अंधारे यांच्यावर टिप्पणी करताना त्यांचा लवकरच पर्दाफाश करु, असा इशारा दिला. तसेच पोटच्या मुलीला कधी आपल्या छातीचं दूध पाजलं नाही पण संजय राऊतांसाठी डोळ्यात अश्रू आले… असं म्हणत वाघमारेंनी अंधारेंवर टीका केली. या सगळ्या टीका-टिप्पणीनंतर अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका तर मांडलीच… पण आपल्या वादात लेकीलाही ओढल्याची खंत मनात ठेऊन रविवारी सायंकाळी त्यांनी एक इमोशनल फेसबुक पोस्ट लिहिली. तसेच भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत, असं सांगताना आपण रडणारी नसून लढणारी असल्याचं सांगत त्यांनी पुढील संघर्षाला तयार असल्याचंच सांगितलं.
वैजनाथ यांना सावरण्यासाठी अंधारेंनी केली मदत
2007 साली वैजनाथ वाघमारे व सुषमा अंधारे या दोघांची ओळख झाली आणि प्रेम झाले. त्यांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण गावात पसरली. तेव्हा वैजनाथ यांची पत्नी आणि सुषमा यात भांडणे होऊ लागली. सुषमा त्यावेळी अंबाजोगाईत भाड्याच्या खोलीत राहत होत्या. या दोघांना एक मुलगी आहे. वैजनाथ यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांना सावरण्यासाठी सुषमा यांनी आडस या गावात ब्लास्टिंग माईनचा कारखाना थाटून दिला. त्यानंतर वैजनाथ यांची परिस्थिती सुधारली, असं सांगितलं जातं. मात्र आर्थिक देवाणघेवाणीत यांचे सतत खटके उडत होते. पाच वर्षांपासून सुषमा आणि वैजनाथ यांच्यात दुरावा आहे. सुषमा आणि वैजनाथ यांचा विवाह झाल्याची गावात कुठेही आणि नातेवाईकांना माहीत नाही. पाच वर्षांपूर्वी उमराई इथं सुषमा आणि वैजनाथ यांचं कडाक्याचं भांडण झालं, नातेवाईकांनी सोडवणूक केली. त्यानंतर यांचे संबंध बिनसले. जे आजतागायत आहे. दोघांनाही एकमेकांबद्दल फारसे काही माहिती नाही.
सुषमा अंधारे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात..
प्रिय कब्बु,
“तू फक्त ४५ दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. पण अख्ख कुटुंब पाठीशी उभं राहिलं. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलून मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले. बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!”
तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात, बाबासाहेब लिहितात, “जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत, त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील.. भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा”