साकळी ता.यावल (वार्ताहर) गेल्या एक ते दीड महिन्यापासून ग्राम पंचायत प्रशासक गायब झालेले आहे. यामुळे गावाच्या विकासकामांना खिळ बसलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीतील प्रशासक अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा ‘गांधीगिरी’च्या मार्गाने निषेध व्यक्त केला आहे.
येथून जवळच असलेल्या शिरसाड ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायतीची निवडणूक घेता येत नसल्याने येथील ग्रामपंचायतीवर शासनाच्या आदेशान्वये गेल्या दीड महिन्यापासून प्रशासक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. दरम्यान हजर झाल्यापासून प्रशासक अधिकारी यांनी फक्त एकच दिवस शिरसाड ग्रामपंचायतीला येथे भेट दिलेली आहे. तर गेल्या एक ते दीड महिन्यापासून ते गायब झालेले आहे. यामुळे गावाच्या विकासकामांना खिळ बसलेला आहे.
कोणतेही काम वेळेत होत नसल्याने कागदपत्र व इतर कामांच्या अभावी ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहे. सदरील प्रशासन अधिकारी घरी राहूनच ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांवर सह्या करत नुसती कागदोपत्री आपली जबाबदारी पार पाडीत आहे. प्रत्यक्षात कामकाज मात्र शून्य होत आहे. त्यामुळे गावाच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पुरता बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे संतप्त होऊन आज दि.१९ रोजी काही पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीतील प्रशासक अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा ‘गांधीगिरी’च्या मार्गाने निषेध व्यक्त केलेला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रितेश (रॉकी) पाटील, प्रमोद सोनवणे,माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान सोनवणे (मेंबर),रोहीदास तायडे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी अशा अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे गाव विकासापासून मागे पडेल. अशी संतप्त भावना व्यक्त करण्यात आली. प्रशासक अधिकारी लवकरात लवकर ग्रामपंचायतीस हजर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संबंधित प्रकरणी निषेध व्यक्त करणाऱ्या पदाधिकारी व नागरिकांकडून प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे. प्रसिद्धी पत्रकावर दहा जणांच्या सह्या आहे.