मुंबई (वृत्तसंस्था) सिनेसृष्टीशी इमान राखायचे तर सत्ताधाऱ्यांकडून टपली मारली जाईल. त्यामुळे सूर्य हा पश्चिमेलाच उगवतो असा प्रचार करणे हाच त्यांचा धर्म ठरतो. सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात,’ असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या काही कलाकारांवर टीका केली आहे. तर जया बच्चन यांची पाठराखण केली आहे. ‘सामना’मध्ये म्हटले आहे की, हिंदुस्थानी सिनेसृष्टीस एक परंपरा आणि इतिहास आहे. या मायानगरीत जसे ‘मायावी’ लोक आले आणि गेले तसे अनेक संतसज्जनही होतेच. हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया रचणारे दादासाहेब फाळके हे महाराष्ट्राचेच होते. त्यांनी मोठ्या कष्टातून या साम्राज्याचे तोरण बांधले. एकापेक्षा एक सरस कलाकारांचे योगदान हिंदी सिनेसृष्टीला आहे. पडद्याचे बॉक्स ऑफिस खुळखुळत ठेवायला आमिर, शाहरुख, सलमान अशा ‘खान’ मंडळींची मदत झालीच आहे. हे सर्व लोक फक्त गटारातच लोळत होते व ड्रग्ज घेत होते असा दावा कोणी करत असेल तर बकवास करणाऱ्यांच्या तोंडाचा वास आधी घ्यायला हवा. स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे.
‘सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी जया बच्चन यांची बिजली कडाडली आहे,’ असेही शिवसेनेने म्हटले आहे. आमचे सिने कलाकार सामाजिक दायित्वही पार पाडीत असतात. युद्धकाळात सुनील दत्त व त्यांचे सहकारी सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोरंजन करीत असत. मनोज कुमारने सदैव ‘राष्ट्रीय’ भावनेनेच चित्रपट निर्मिती केली. अनेक कलाकार संकटसमयी खिशात हात घालून मदत करीत असतात. राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटात सामाजिक दृष्टिकोन, समाजवाद याची ठिणगी दिसत होतीच. आमिर खानचे चित्रपटही आज त्याच चौकटीचे आहेत. हे सर्व लोक नशेत धूत होऊन हे राष्ट्रीय कार्य करीत आहेत. अशा गुळण्या टाकणे हा देशाचाच अवमान आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.