फैजपूर (प्रतिनिधी) ऑस्ट्रेलिया व पेनिया या देशातील विद्यापिठात हिंदी भाषा विद्यार्थ्यांना शिकवली जात असून देशासह राज्यात हिंदी भाषेत रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. हिंदी भाषेला विश्व भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन पंजाब येथील अमृतसर गुरू नानक देव विद्यापीठाचे हिंदी विभागातील प्रा. डॉ. सुनील कुमार यांनी व्यक्त केले.
भुसावळ येथील पु.ओं. नाहाटा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने ‘हिंदी सप्ताह उत्सव 2020’ या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. प्राचार्य प्रा. डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड किनवट महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. गजानन वानखेडे ,भुसावळ येथील पीपल्स महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश चव्हाण, फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय सोनजे, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हिंदी विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. रेखा गाजरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी त्यांनी हिंदी विभागाची परंपरा व इतिहास याबाबत सविस्तर विवेचन केले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी डिजिटल प्लॉटफार्मच्या माध्यमातून पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात ‘हिंदी सप्ताह उत्सव 2020’ साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांकडून कविता ,आलेख याचेही वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन भाऊ फालक, चेअरमन महेश भाऊ फालक, संस्थेचे पदाधिकारी, तसेच प्राचार्य प्रा. डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन.ई. भंगाळे, उपप्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यासह प्राध्यापकांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनोज पाटील यांनी केले.यावेळी विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. प्रा. डॉ. राजेंद्र तायडे यांनी आभार मानले.