पुणे (वृत्तसंस्था) कोरोनामुळे निर्माण झालेली भीती आणि आलेल्या नैराश्यातून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सहकारनगर भागात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संदीप नागनाथ भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सहकारनगरमध्ये संदीप भोसले हे आपल्या कुटुंबासोबत अनेक वर्षापासून राहण्यास होते. संदीप यांच्या वडिलांना देखील करोनाची लागण झाली होती. या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांत संदीप यांची देखील कोरोना टेस्ट पोझिटिव्ह आली होती. संदीप यांनी कोरोनावरील उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीमधील घरी राहत होते. दरम्यान, संदीप यांचा भाऊ काल सकाळच्या सुमारास नाष्टा घेऊन पद्मावती येथील घरी आल्यावर, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसून आले.