मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अनेक आमदार मंत्रिपद मिळविण्यासाठी चकरा मारताना दिसत आहेत. याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीय.
मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या आरोपींनी 100 कोटी मागितले होते. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असं या आरोपींनी सांगितलं होतं. या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले होते. याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने आरोपीला पकडले.
या आरोपींची चौकशी केली असता आणखी 3 जणांची नावं समोर आली. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (राहणार कोल्हापूर ) योगेश मधुकर कुलकर्णी (राहणार पाचपाखाडी, ठाणे) सागर विकास संगवई (राहणार ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (राहणार नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या आरोपींनी आणखी किती आमदारांना अशा प्रकार फसवले आहे, याचा तपास पोलीस करत आहे.