अमळनेर (प्रतिनिधी) युरिया खतप्रकरणी शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे कळताच, कृषी विभागाच्या जिल्ह्याच्या तक्रार निवारण केंद्राच्या भरारी पथकाने २९ रोजी तालुक्यातील ११ कृषी केंद्रांना भेटी देत तपासणी केली. यात मोठी अनियमितता आढळल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नमूद केले असून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे ही निदर्शनास आले. यामुळे कृषी केंद्रांचे धाबे दणाणले आहे.
अमळनेर तालुक्यात युरिया खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत असल्याबाबत तसेच अधिकचे पैसे घेऊन लुटी सुरू असल्याचे उघडकीस आणल्यानंतर २९ जूनला रविवारी सुट्टीच्या दिवशी ही जिल्हा स्तरावरून बियाणे, खते, कीटकनाशके तक्रार निवारण कक्षानेभेट देत अमळनेर शहरात १० तर पातोंडा येथील एका कृषी केंद्रांवर डमी ग्राहक पाठवलेत. मात्र, या डमी ग्राहकाला युरिया उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठवून देण्यात आले. त्यानंतर पथक प्रमुख व जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी या कृषी केंद्रावर भेट दिली. त्यावेळी या कृषी केंद्रांवर युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. तर केवळ अधिकचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरवत असल्याचे ही स्पष्ट झाले. तसेच कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याने या कृषी केंद्र चालकांची कानउघडणी करण्यात आल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी सांगितले.