यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, गर्दीतून नागरिकांनी काही संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना काहीच मिळाले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अट्रावल येथील प्रसिद्ध असलेल्या मुंजोबाची यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील सपना भरत कोळी यांच्यासह विविध महिला आल्या होत्या. तर कोळी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. साडेसात हजारांची सोन्याची पोत चोरी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याच यात्रेत यावल तालुक्यातील नायगाव येथील रत्ना रवींद्र कुंभार, थोरगव्हाण येथील दीपाली सतीश पाटील, धरणगाव येथील पूनम नंदू धनगर, जळगावच्या महाबळ कॉलनीतील छाया रवींद्र हिरे, भुसावळ येथील मनीषा संजय हिरे, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दीपाली ज्ञानेश्वर बाविस्कर, भुसावळ येथील अन्नपूर्णा वसंत सुरवाडे, यावल तालुक्यातील निमगाव येथील भावना प्रवीण तायडे व पारोळा येथील ज्योती हेमंत महाजन अशा या ११ महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या पोत चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी काही संशयित महिलांना व मुलींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, चौकशी अंति त्यांच्याकडून काहीच आढळून आले नाही.