नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली. येथील हलवड जीआयडीसीमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना मोठा फटका बसला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर अनेक जण गाडले गेल्याची भीती आहे. बचाव पथके घटनास्थळी असून भिंतीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
राज्याचे कामगार आणि रोजगार मंत्री आणि स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की, हलवड औद्योगिक परिसरात असलेल्या समुद्री मीठ कारखान्यात ही दुःखद घटना घडली. “कारखान्यातील किमान १२ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत,” असे ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोरबी येथील मीठ कारखान्याची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मोरबीचे जिल्हाधिकारी आणि यंत्रणा चालकांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले.