जळगाव (प्रतिनिधी) दर महिन्याला महिलांकडून दाम्पत्याने खासगी भिशीची रक्कम गोळा करुन तसेच सासऱ्याच्या उपचारासाठी उसनवारीने पैसे घेवून १३ महिलांना ५५ लाखात गंडविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी महिलांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सविता संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे या दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील कोल्हे हिल्स परिसरात योजना नगरातील महिलांकडून सविता सोळंखे या महिलेने दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने रक्कम जमा केली. यातील पैसे देणाऱ्या काही महिलांच्या भिशी लागल्या, मात्र पैशाचे काम असल्याचे सांगत ही रक्कम सविता सोळंखे महिलेनेच स्वतःजवळ ठेवून घेतली आहे. या पैशांच्या मोबदल्यात तुम्हाला जास्त पैसे मिळतील, असे अमिष देखील या महिलेसह तिचा पती संजय सोळंखे या दोघांनी संगनमत करून इतर महिलांना दाखवले. त्यानंतर महिलेचे सासरे आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून परिसरातील महिलांकडून या महिलेने उसनवारीने पैसे घेतले आहे.
फसवणुक झालेल्या महिलांचा बचत गट देखील आहे. त्यांच्या नावाने बचत गटाच्या माध्यमातून कर्ज तर घेतलेच शिवाय काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्जही काढून ती रक्कमही सोळंखे या महिलेने घेतली. प्रत्येक वेळी आजार किंवा इतर कोणत्याही कामाच्या बहाण्याने विश्वास संपादन करत ही महिला रक्कम घेऊन महिलांची फसवणुक केली. १३ महिलांकडून घेतले सुमारे ४१ लाख वेळोवेळी कुठल्या न कुठल्या कारणाने दाम्पत्याने महिलांकडून पैसे घेतले आहे.
यामध्ये पल्लवी विजय ठोसर (वय ३९, रा. योजना नगर) या महिलेकडून सविता सोळंखे यांनी सुमारे १३ लाख ४६ हजार २०० रुपये घेतले आहे. या शिवाय इंदूबाई डोंगर डोळे, मीनाबाई संदीप पाटील, सोनाली संतोष जलंकार, गायत्री प्रदीप बानाईत, ज्योती विलास सरवादे सिंधुबाई जगन्नाथ पारधे लक्ष्मी श्यामकांत तायडे, अनिता हेमराज सोनवणे, आशा सुनील लोखंडे, आशा अशोक सोनवणे, अश्विनी तुषार गायकवाड, कोकिळाबाई प्रकाश पाटील (सर्व रा. योजनानगर) यांच्याकडून ४१ लाख ७६ हजार ८० रुपये असे एकूण सर्व महिलांना ५५ लाख रुपयात गंडवल्याचा धक्कादायक पकार उघडकीस आला आहे.