ठाणे (वृत्तसंस्था) एकीकडे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू मुळपदावर येत असतांनाच ठाण्यात तब्बल १५ पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूच्या शंकेने हाहाकार उडाला आहे. ही घटना आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलातील, जिथे आज मॉर्निंग वॉक साठी आलेल्या काही नागरिकांना एकामागोमाग एक असे पोंड हेरॉन म्हणजेच पाण बगळे मेलेले आढळून आले.
देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ या राज्यांत बर्ड फ्यू साथ वेगाने पसरत असतानाच ठाण्यातील वाघबीळ परिसरात १५ पाणबगळे मृतावस्थेत आढळल्याने काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेतला जात आहे. आरोग्य यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकारावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरातील विजय नगर, वाटिक इमारत येथून आज दुपारी साडेतीन वाजता पक्षांच्या मृत्यूची तक्रार आली होती. ही तक्रार प्राप्त होताच ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घटनास्थळी १५ पाणबगळा जातीचे पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. या पक्षांना पशुवैधकीय विभागामार्फत पशुसंवर्धन रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
सदर पाणबगळ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत सविस्तर अहवाल पशुसंवर्धन रुग्णालय, मुंबई यांच्याकडून प्राप्त होईल असे पशुवैधकीय विभागातून कळवण्यात आले आहे. परंतु, सध्या केरळ व अन्य राज्यांत बर्ड फ्लूचे संकट घोंगावत असताना ठाण्यात पक्षांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.