वाशिम (वृत्तसंस्था) पोहरादेवी येथील जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होते. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे.
कबिरदास महाराजांनी २१ तारखेला कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र तरीही ते संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. कबिरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहे. संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी प्रथम महंत कबिरदास महाराज यांची भेट घेतली होती. त्यादिवशी विविध ठिकाणहून हजारो जण पोहरादेवीत उपस्थित होते. मात्र आता या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात आहे.
पोहरादेवी गडावर गर्दी
वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवार २२ फेब्रुवारीला वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर विरोधकांनी राठोडांवर टीकेची झोड उठवली. त्यावर आपण कोणालाही निमंत्रण दिले नव्हते, समर्थकांनीच गर्दी केली, असं म्हणत हात झटकले होते.
वाशिमच्या शाळेत २२९ विद्यार्थी कोरोनाबाधित
वाशिम जिल्ह्याच्या देगावमधील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी दोन दिवसात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या.