पुणे (वृत्तसंस्था) पुणे ते पंढरपूरदरम्यानच्या सर्व जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील तळांच्या ठिकाणी स्वच्छतेपासून, पाणी, शौचालये, वीज, आरोग्य सुविधा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २१ कोटी ६७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार सर्व सुविधा पुरवण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
श्रीक्षेत्र देहू, आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पूर्वतयारीसंदर्भात शुक्रवारी पालकमंत्री पवार यांनी नियोजनासंदर्भात बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी आमदार दिलीप मोहिते-पाटील, संजय जगताप, दत्तात्रेय भरणे, बबन शिंदे, संजय शिंद, सुनील कांबळे, समाधान आवताडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पदाधिकारी, पोलीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी, दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सन २०१७-१८ मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्यातील पालख्यांसोबत असणाऱ्या वारकरी, भाविकांकरिता तात्पुरती स्वच्छतागृहे, शौचालये, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २१ कोटी ६७ लाख ५० हजार रुपयांच्या निधीला मान्यता देत राज्य शासनाने १६ कोटी २५ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा निधी थेट जिल्हा परिषदेच्या बीडीएस प्रणालीद्वारे नियोजनानुसार वितरित करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती सांगताना पवार म्हणाले, तीर्थक्षेत्र देहू, आळंदी येथून २९ जून रोजी पालख्या, दिड्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. तत्पूर्वी, भाविक मोठ्या प्रमाणात देहू, आळंदी येथे इंद्रायणी स्नान करत असतात. इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.