जामनेर (प्रतिनिधी) येथील सुलेमान पठाण (वय 21) या तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मॉब लिंचिंग आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेचा तपशील असा की, सुलेमान पठाण हा जामनेरमधील एका कॅफेमध्ये एका मुलीसोबत बसलेला असताना काहीजण तिथे आले आणि त्याला जबरदस्तीने बाहेर घेऊन गेले. त्यानंतर त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर सुलेमानच्या नातेवाईकांनी सुरुवातीला रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि जामनेर शहरात दीड तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतरच वातावरण शांत झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या मूळगावी बेटावदमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, “या प्रकरणी चार आरोपींना त्याच दिवशी अटक करण्यात आली, आणखी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तसेच एकाला जळगावमधून अटक करण्यात आली. एकूण आठ आरोपींना अटक झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “काहींकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली असून, त्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय घेऊन सखोल चौकशी केली जाईल आणि कठोर कारवाई होईल.”
शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसला, तरी प्रथमदर्शनी डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींवर तत्काळ कारवाई करून मकोका लागू करण्याच्या मागणीसाठी नगरपालिका चौकात आणि पाचोरा रोडवरील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमावाकडून ‘रास्ता रोको’ करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि पोलिस बंदोबस्तात शववाहिका शहराबाहेर काढण्यात आली.