जालना (वृत्तसंस्था) कुटुंबियांसह शेतात काम करतांना घाम आल्यानंतर २२ वर्षीय एक तरुण अचानक जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. विकास नवल असे मयत तरुणाचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
विकास हा पाथरी (ता. फुलंब्री) येथे बी.एस्सी. ॲग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो सुटी असल्याने काही दिवसांपूर्वीच गावाकडे आला होता. तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत होता. गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने वाडी खुर्द येथील शेतकरी गुलाबराव रामा नवल हे आपल्या दोन्ही मुलांसह गुरुवारी सकाळी नेहमी प्रमाणे शेतात गेले होते.
११ वाजेच्या सुमारास विकास नवल यानेही वडील व भावासोबत कोळपे धरले होते. सर्व सोयाबीनच्या शेतात कोळपणी करत होते. त्याचवेळी पप्पा मला घाम येतोय, असे म्हणताच विकास जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आपल्या डोळ्यासमोर तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने वडिलांनी एकच हंबरडा फोडला होता.