जामनेर (प्रतिनिधी) लग्नात झालेल्या भांडणाला कंटाळुन विषारी पदार्थ सेवन करून तालुक्यातील कापूसवाडी गावातील २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात आशाबाई शेषराव इंगळे (वय ४७, रा. कापूसवाडी ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ जानेवारी २०२२ रोजी त्यांचा मुलगा मोहन इंगळे व रामा गयबु गोपाळ यांच्यामध्ये कापुसवाडी गावातील राजु शंकर उबाळे यांच्या मुलीच्या लग्नात वादविवाद झाला होता. तो वाद गावातील लोकांनी मिटविल्यानंतर पुन्हा सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास रामा गयबू गोपाळ, जिजाबाई गयबू गोपाळ, राधा रामा गोपाळ, किरण रामा गोपाळ, अर्जुन रामा गोपाळ, रेखा विलास गोपाळ, विलास प्रल्हाद गोपाळ (सर्व रा. कापुसवाडी ता. जामनेर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमावुन फिर्यादीच्या घराबाहेर येवुन त्यांनी फिर्यादी व मयत यांना शिवीगाळ व चापटाबुक्यांनी मारहाण केली. त्यांनतर सदरचे भांडण मिटल्यानंतर मयत याने भांडणाला कंटाळुन घरामध्ये जावुन विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केली होती. तरी आरोपींनी मयत यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक किशोर रामेश्वर पाटील करीत आहेत.