जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडनगरी येथे सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांची मंगलपोत व एका महिलेची पर्स लांबविल्याचे समोर आले होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कथास्थळी संशयितरित्या फिरतांना २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेत तालुका पोलिसांकडे दिले आहे.
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात ५ डिसेंबरपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली. कथेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून कथास्थळी जाण्यासाठी सर्वच मार्गावर मोठी गर्दी उसळली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्या. यानंतर चोरीच्या विचाराने संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांची रात्रीपर्यंत चौकशी सुरू होती.
















