जळगाव (प्रतिनिधी) बारामती तालुक्यातील विविध गावांमधील पाणी समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या मागणीनुसार आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या योजनांचा प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. याच्या अंतर्गत तब्बल ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या योजनांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश आज ना. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन सुपूर्द केली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत जळगाव जिल्ह्यातील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठीचा सुधारित निधी आणि बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा याबाबतची चर्चा करण्यात आली असून याला उपमुख्यमंत्र्यांनी सनिधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, बारामती तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने राज्याचे उपमुख्यंत्री अजितदादा पवार यांनी विविध गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी अशी मागणी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने आज ना. गुलाबराव पाटील यांनी बारामती मौजे देऊळगाव येथील ६५ कोटी ०८ लक्ष; मौजे सुपे ५७ कोटी ९८ लक्ष; मौजे लोणी भापकर ५७ कोटी ५८ लक्ष; मौजे गोजूबावी ५१ कोटी १५ लक्ष; मौजे कटफट ६४ कोटी ३८ लक्ष आणि थोपडेवाणी लाटे २० कोटी ७० लक्ष अशा एकूण ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांची तरतूद असणार्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली. आणि याबाबतची मंजुरीचे आदेश ना. अजितदादा पवार यांच्या दालनात जाऊन प्रदान केली.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील काही प्रलंबीत कामांबाबत चर्चा केली. यात प्रामुख्याने आसोदा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाच्या सुधारित आराखड्याला निधीची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी केली. तर धरणगाव येथील बालकवि ठोंबरे यांच्या स्मारकाला निधी मिळावा अशी मागणी देखील त्यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी या दोन्ही स्मारकांसाठी लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.