नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
ईश्वर मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर काही ठिकाणी वीजादेखील पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत वीज पडून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्य सरकार स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सक्रियपणे करत आहे. मुसळधार पावसानंतर बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुरुवारी वादळ आणि गडगडाटामुळे भागलपूरमध्ये 7, मुझफ्फरपूरमध्ये 6, सारणमध्ये 3, लखीसरायमध्ये 3, मुंगेरमध्ये 2, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये 2 तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीच्या काळात आपण पीडित कुटुंबांसोबत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.