जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. तसेच हे पूल चार विधानसभा मतदारसंघांमध्ये तयार करण्यात येणार आहेत. संबंधीत आमदारांनी याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ना. पाटील यांनी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने या कामांना मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान, रस्ते मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर जनतेचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात महामार्गासारखे दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने २० पुलांसाठी तब्बल ३४ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
असा असेल २० पुलांसाठी ३४ कोटींचा निधी
यात धरणगाव तालुक्यातील धार ते चोरगाव या रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ४१ लक्ष, पथराड – वंजारी खपाट ते बोरखेडा रस्त्यावर १ कोटी ४८ लक्ष तसेच जळगाव तालुक्यातील हायवे ते तरसोद रस्त्यावर १ कोटी २८ लक्ष व बिलखेडा ते बिलवाडी या रस्त्यावर १ कोटी ३५ लक्ष असे एकूण जळगाव ग्रामीण मध्ये ६ पुलांच्या कामासाठी ७ कोटी ४२ लक्षच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
यासोबत जामनेर तालुक्यातील स्टेय हायवे ४२ ते सावखेडा, एमडीआर २९ ते शेळगाव,चिंचखेडा ते वाकडी; स्टेट हायवे ४६ ते गोद्री रस्त्यावर ६ पुलांच्या कामांसाठी १६ कोटी निधी मिळणार आहे. चोपडा तालुक्यातील मालखेडा शेंदाणी रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ३३ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय, पाचोरा तालुक्यातील लोहटार गाळण चिंचोले नगरदेवळा खाजोळा सारवे बु. रस्त्यावर १ पुलाच्या कामांसाठी २ कोटी २१ लक्ष; यावल तालुक्यातील सातोद कोळवद असारबारी रस्त्यावर २ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी १९ लक्ष रावेर तालुक्यातील भोर – पुनरखेडा – पातोंडी – धुरखेडा रस्त्यावर १ पुलाच्या कामांसाठी ४ कोटी १३ लक्ष मिळणार आहेत. तर, बोदवड तालुक्यातील शेलवड वाकी रस्त्यावर १ पुलाच्या कामासाठी १ कोटी ६ लक्ष निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.