जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मोहाडी येथील ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात अंगावर डिझेल टाकून स्वतःला पेटवून घेतले. दरम्यान, विवाहितेला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना तिचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेखा रमेश राठोड (वय ३५ रा. मोहाडी ता.जि.जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, रेखा राठोड यांचे तालुक्यातील सुभाष वाडी येथे माहेर आहे. मोहाडी येथील त्यांचे सासर असून पती रमेश राठोड व दोन मुलांसह राहतात. आज मंगळवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी पती रमेश राठोड कामासाठी रिक्षा घेवून निघून गेले. दुपारी २ वाजेच्या सुमारास विवाहितेचे दोन्ही मुले बाहेर खेळण्यासाठी गेले होते. त्यांनी दुपारी अंगावर डिझेल टाकून स्वतःला पेटवून घेतले. अंगावर डिझेलने पेट घेताच घरातून धुर निघायला लागला. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी धाव घेवून आग विझविली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोलीस नाईक सुनील सोनार आणि पो. कॉ. शांताराम पाटील हे करीत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मयत विवाहितेचे आई विमल चव्हाण आणि वडील धनराज चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला होता. दरम्यान सासरच्यांनीच मुलीला जाळल्याचा आरोप केला आहे.