भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील बाजारपेठेतील चार दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजारांची रोकड लांबवल्याचे मंगळवारी उघडकीस आले आहे. केवळ दोन दिवसात आठ ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
शहरात सोमवारी सकाळी दवाखान्यासह अन्य तीन ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यांचा तपास लागण्यापूर्वीच रात्री पुन्हा बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चार दुकान फोडली आहेत. मंगळवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या. त्यात चाेरट्यांनी चहा पावडरचे दुकान, कृषी केंद्र, कपडे, बॅग विक्रेत्याचे दुकान फोडले. बाजारपेठचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड, एपीआय मंगेश गाेटला यांनी चाेरी झालेल्या दुकानांची पाहणी केली. त्यात चोरट्यांनी कुठे शटर, छताचा पत्रा उचकवून, तर कुठे भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केल्याचे समोर आले. यामुळे चोरटे सराईत असावे असा अंदाज समोर आला.
चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून अप्सरा चाैकातील चाेरडिया टी सेंटरच्या आत प्रवेश केला. हे दुकान नगिनचंद बिरदीचंद चाेरडीया व विनाेद चाेरडीया यांच्या मालकीचे आहे. साेमवारी रात्री ९ वाजता चोरडिया दुकान बंद करून घरी गेले. यावेळी त्यांनी दुकानातील खोक्यात ५० हजार रूपये ठेवले. मंगळवारी सकाळी ९ वाजता विनाेद चाेरडिया यांनी दुकान उघडल्यावर चोरीची घटना समोर आली.