लातूर (वृत्तसंस्था) ५० हजार रुपये दे अन्यथा तुझ्या मोबाईलमधील मुलींचे फोटो तुझ्या घराच्यांना दाखवितो, असे सांगत या विद्यार्थ्याच्या खिशातील ४ हजार ८०० रुपयेही काढून घेतल्याची आपबितीची तक्रार एका विद्यार्थ्याने थेट पोलीस अधीक्षकांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या व्हॉट्सअॅपवर विद्यार्थ्याने पाठविलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, उदगीर शहरातील शेल्हाळ रोडवर वास्तव्यास असलेला एक तरुण शुक्रवारी (दि.४) रात्री उशिरा शहरातील क्वालिटी पान शॉप येथे थांबला होता. यावेळी उदगीर शहर पोलिसांची गाडी तेथे आली, त्यांनी तेथे थांबलेल्या मुलांना मारहाण करुन पोलीस ठाण्यात नेले. ठाण्यात नेल्यानंतर त्या मुलांना तेथेही मारहाण करण्यात आली. थोड्या वेळानंतर ठाण्यातील साहेब आले, त्याची विचारपूस करुन त्यांनी मुलांना सोडून दिले.
यानंतर ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने या विद्यार्थ्यांचा मोबाईल घेतला आणि मोबाईलची फोटो गॅलरी चेक केली. यावेळी या मोबाईलमध्ये काही मुलींच्या फोटो असल्याचे या कर्मचाऱ्याचा निदर्शनास आले. त्यामुळे असले फोटो मोबाईलमध्ये ठेवतोस का, असे म्हणत या कर्मचाऱ्याने त्यास दम दिला आणि चल तुझ्या घरच्यांना हे फोटो दाखवतो असे म्हणत त्याला त्याच्या घराकडे घेऊन गेले. परंतु, ही बाब घरच्यांना समजेल म्हणून या विद्यार्थ्याने सदर पोलिसाच्या हातापाया पडून माफी मागितली. त्यामुळे या विद्यार्थ्याला या कर्मचाऱ्याने सोडले.
परंतु यानंतर त्याचा मोबाईल काढून घेतला. त्यामुळे रात्री २ वाजता या विद्यार्थ्याने सदर पोलीस कर्मचाऱ्याच्या परिचय असलेल्या आपल्या एका मित्रास फोन करुन माझा मोबाईल मला परत देण्यास त्यांना सांग, असे म्हणत विनंती केली. मित्राने सदर पोलीस कर्मचाऱ्यास विनंती करताच त्या कर्मचाऱ्याने या दोघांनाही रात्री २ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर येण्यास सांगितले. त्यामुळे दोघेही मध्यरात्री सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले.
यावेळी या विद्यार्थ्यांच्या खिशात ४ हजार ८०० रुपये होते. हे पैसेही सदर कर्मचाऱ्याने काढून घेतले आणि सकाळी ५० हजार रुपये घेऊन ये आणि तुझा मोबाईल घेऊन जा, असा दम दिला. या विद्यार्थ्यांचा मोबाईल सदर पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या फिंगरप्रिंटने लॉक केला. तसेच पैसे नाही दिल्यास अन्य कोणत्याही गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिल्याचे या विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे. आता ही तक्रार सदर विद्यार्थ्याने थेट पोलीस अधीक्षकांच्या व्हॉट्सअॅपवर नंबरवर पाठवली आहे. दरम्यान, याबाबतचे वृत्त आज पुण्य नगरी दैनिकाने दिले आहे.