जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पाच नगरसेवकांमध्ये दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, रेश्मा कुंदन काळे, प्रतीभा देशमुख यांचा समावेश आहे.
सत्ताधारी गटातील सेनेच्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने शिंदे गटाला जाहीर पाठींबा दिल्याचे दिसून येत आहे. याआधी मनपातील सभागृह नेते ललित कोल्हे, सिंधूताई कोल्हे, प्रविण कोल्हे यांनी देखील आधीच शिंदे गटाला समर्थन दिले होते. त्यामुळे आता मनपातील सत्ताधारी गटातील जवळ-जवळ ८ नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मनपातील अजून काही नगरसेवक देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
एकीकडे शिवसेना महानगरकडून मनपातील शिवसेना नगरसेवकांचे १०० रुपयांच्या स्टँपवर निष्ठापत्र भरून घेतले जात असताना, दुसरीकडे मनपातील शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. महापालिकेला मिळालेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतील कामांचा मार्ग मोकळा झाला असल्याने ५८ कोटी रुपयांच्या निधीतील कामांना मंजूरी मिळण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर ५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.