चांदवड (वृत्तसंस्था) मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एसटी न बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन ५ जण ठार झाले, तर ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन तरुण, एक पुरुष, तर एका महिलेचा समावेश असून, जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
जळगावकडून वसईकडे ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी वसई आगाराची एसटी बस (क्र. एमएच १४ केयू ३६३१) ही मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ ट्रकला म (क्र. ओडी ०५ झेड ००४५) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक ट्रकने लेनकटिंग केल्याने बसची ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, एसटी बसच्या डाव्या बाजूचा पत्रा अर्ध्या भागापर्यंत कापला जाऊन बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
बसमध्ये जवळपास ४५ प्रवासी असल्याने जखमी तसेच इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अडकलेल्या प्रवाशांचा आक्रोश काळजाला चिरणारा होता. अपघाताच्या भीषण आवाजाने परिसरातील नागरिक तसेच रस्त्याने जाणारे नागरिक मदतीसाठी धावून आले. या अपघातात खलिदा गुलाम हुसेन (वय ५८, रा. भिवंडी), साई संजय देवरे (१४, रा. उमराणे), बळीराम सोनू अहिरे (७३, रा. कॉलेज रोड, नाशिक), सुरेश तुकाराम सावंत (२८, डोंगरगाव, मेशी) आणि बसचे वाहक विनोद शिंदे यांचा मृत्यू झाला.