चोपडा (प्रतिनिधी) मक्याची परस्पर विक्री करून चोपड्यातील व्यापाऱ्याची ५ लाख ४४ हजार ७३० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सुनील मगनलाल अग्रवाल (वय ५४, रा. अग्रसेन नगर चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ७ डिसेंबर २०२१ ते दि. ९ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये वेळोवेळी सुनील मगनलाल अग्रवाल यांच्या मालकीचे मे. मगनलाल गोवींदराम अग्रवाल या नावाचे भुसार मालाचे दुकान आहे. सुनील यांच्या परीचयाचे दलाल रामनिवास अँड कंपनी प्रो प्रा. रामनिवास (रा. सुरत) यांच्या सांगण्यावरुन त्याचे परीचयाचा व्यापारी विनायक सिड्स राजकोट गुजराथ प्रो. प्रा. विपुलभाई यास ५,४४,७३० रुपये किंमतीचा ३०२ कि. क्विटल मका विक्री केले. नंतर सदरचा भुसार माल दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी त्यास पोच केला. त्यानंतर सदरचा मका हा सरदार कॅटल सिड्स टंकारा मोरबी (राजकोट) यांना परस्पर विक्री करुन त्यांच्याकडुन पैसे घेवून सदरचे पैसे सुनील यांना न देता स्वत:जवळ ठेवून घेतले. नंतर त्याचेकडेस सुनील व साक्षीदार यांनी वेळोवेळी पैशांची मागणी केली असता संबंधीत व्यापारी याने सुनील यांना त्याचे एचडीएफसी बँक शाखा राची ओढनगर राजकोट येथील विनाकस सीड्स नावे बंद असलेल्या बँक खात्याचा ३,५०,००० रुपयाचा चेक दिला. मात्र आज पावेतो त्यास विक्री केलेल्या मका मालाचे पैसे मिळाले नाही. तसेच देण्यास टाळाटाळ करुन सुनील यांचा विश्वासघात व फसवणूक केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात प्रो. प्रा. विपुलभाई विनायक सिड्स विपुलभाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अजित नथ्थु सावळे हे करीत आहेत.
















