गडचिरोली (वृत्तसंस्था) धानोरा तालुक्यातील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी दुपारी पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यापैकी दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला पोलिसांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर इतर काही नक्षलवादी जंगलात पळून गेले. ठार झालेले नक्षलवादी प्लाटून क्रमांक १५ चे सदस्य आहेत. या वर्षातील माओवाद्यांच्या विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितले. दुसरीकडे, तेलंगणा राज्यातही झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. नारेकसा जंगल परिसरात C-60 पथकाचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. जवानांनी माओवाद्यांचा कॅम्पदेखील उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.