रायबरेली (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशातील एका महिलेला हुंड्यासाठी तब्बल ५ वेळा तलाक देण्यात आला आहे. इतकंच नाही तर तिचा दोनवेळा हलालाही करण्यात आलाय. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह ७ एप्रिल २०१५ रोजी देह येथील दांदू गावातील मोहम्मद आरिफसोबत झाला होता. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेला तिच्या पतीने घटस्फोट दिला. दरम्यान, पीडित महिला तेव्हा पोलिसात तक्रार दाखल करणार होती. मात्र, कुटुंबियांनी पीडितेवर दबाव टाकला आणि हलालासाठी तिचं लग्न मेव्हण्यासोबत लावून दिलं. हलालानंतर मेव्हणा जाहिदने देखील घटस्फोट घेतला.
हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर, २३ मार्च २०१७ साली पीडितेचं लग्न पुन्हा पहिला पती आरिफसोबत लावण्यात आलं. आरिफसोबत लग्न केल्यानंतर काही दिवस वातावरण शांत होतं. मात्र, त्यानंतर आरिफ आणि त्याच्या कुटुंबियांनी देखील पीडितेचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. वारंवार मागणी करून सुद्धा पैसे मिळत नसल्याने आरिफनेही पीडितेला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर त्याने घटस्फोट दिला. यादरम्यान, पीडितेचा मामा आणि सासरच्या मंडळींमध्ये समझोता झाला आणि पुन्हा एकदा हलाला करून पीडितेचं लग्न मेव्हणा जाहिदसोबत लावण्यात आलं. त्यानंतर जाहिदनेही पुन्हा पीडितेला घटस्फोट दिला. हा सर्व प्रकार एकाच कुटुंबात घडल्यामुळे याचा बाहेर कोणाला सुगावा लागला नाही.
अखेर पीडितेच्या संयमाचा बांध फुटला
दरम्यान, जाहिदसोबत घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा पीडितेचं लग्न तिच्या पहिला पती आरिफसोबत लावण्यात आलं. मात्र, तिसऱ्यांदा लग्न करून सुद्धा १ मार्च २०२२ रोजी आरिफने पुन्हा पीडितेला घटस्फोट दिला. त्यानंतर पुन्हा पीडितेवर मेव्हण्यासोबत हलाला करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या सर्व प्रकारानंतर पीडितेच्या संयमाचा बांध फुटला आणि ती आपल्या माहेरच्या घरी गेली. काही दिवसानंतर पीडितेने तिचा पती आरिफ, सासू नसरीन, देवर बबलू, देवराणी बुऱ्हाण, मेव्हणा जाहिद, दुसरा मेव्हणा आमिर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.