धुळे ः धुळ्यातील राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक अर्थात पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांना पाच हजारांची लाच मागणी करून ती स्वीकारताना धुळे एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. हा सापळा सोमवार, 22 एप्रिल दुपारच्या सुमारास यशस्वी करण्यात आला.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर आहेत. तक्रारदार व त्यांचच्यासोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर असे 14 व 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन घेवुन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचार्यांकडुन प्रत्येकी एक हजारांप्रमाणे पाच हजारांची लाच मागितली व पैसे न आणल्यास सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना बजावले.
तक्रारदार यांना कर्मचार्यांकडून न पैसे जमा करीत लाच देण्याचे इच्छा नसल्याने त्यांनी शनिवार, 20 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. याच दिवशी लाच पडतळणी झाल्यानंतर त्यात लाच मागणी झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवार, 22 रोजी आरोपी पारसस्कर यांनी एस.आर.पी.कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथील राहते घरी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली मात्र संशय आल्यानंतर त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.