मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा मोठा आर्थिक फटका राज्याला बसला आहे. सरकारी तिजोरी खाली असल्यामुळे गेल्यावर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल ६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही स्वतःची समाज माध्यमांवर प्रतिमा गुंतवण्यासाठी शासकीय कोट्यातून करोडो रुपये खर्च करणार आहे.
अजित पवार यांच्या इमेज बिल्टअपसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये सोशल मीडियावर उपयोग अधिक प्रमाणात करण्यासाठी लागणारे तांत्रिक व्यावसायिक कौशल्य नसल्याची बाब कारण देत बाह्य संस्थांकडून अधिक प्रभावीपणे काम व्हावे यासाठी राज्य शासनाच्या लोकाभिमुख निर्णय उपक्रम शासकीय योजना धोरण आधीची माहिती जनसंपर्क जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क साधता यावा यासाठी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, ब्लॉग, वेबसाईट आदी समाज माध्यमातील प्लॅटफॉर्मवर योग्य इमेज उंचावण्याचे काम अजित पवार यांचं करण्यात येणार आहे.
यासाठी फोटो, व्हिडीओज याचा देखील वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी निविदा पद्धतीचा अवलंब करून माहिती व जनसंपर्क विभागाने बाह्य संस्थेची निवड करावी समाज माध्यमातून द्यावयाच्या प्रसिद्धीच्या याच्या मधील त्रुटी राहणार नाहीत तसंच संबंधित कामकाजावर आवश्यक ते नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील महासंचालनालयाकडे राहील.
वित्त विभागाने यासाठी वार्षिक ५ कोटी ९८ लाख रुपयांची तजवीज देखील केल्याबाबत शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे. या पूर्वी अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दोन हात दूर राहिले आहेत. आता सध्याच्या काळात समाज माध्यमांमध्ये अजित पवार हे देखील इतरांप्रमाणेच इमेज सुधारण्याचे काम करू पाहात आहेत, अर्थात शासकीय खर्चातून हे काम केले जाणार असल्याने यावर विरोधक टीका देखील सुरू करत आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशात म्हटले आहे की, माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात सोशल मीडिया हाताळण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक आणि तांत्रिक गोष्टींची माहिती असणाऱ्या लोकांची कमतरता आहे. त्यामुळे हे काम बाहेरच्या यंत्रणेकडे देणे योग्य ठरेल. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय आणि महत्त्वाच्या घोषणांबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे ही या यंत्रणेची जबाबदारी असेल.