जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील किनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. ही घटना मौजे साकळी (ता. यावल) येथील शिवारात घडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घडलेल्या दुर्देवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच वन्यप्राण्याच्या हल्यात मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ 10 लाखाची मदत दिली जाते. त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४७२ मध्ये काम करणाऱ्या पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केश्या पेमा बारेला (वय ७) याच्यावर बिबट्याने दुपारी २ ते २:१५ च्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात केश्या गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रशासनाची तातडीची पावले
घटनेची माहिती मिळताच यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख, सहायक वनसंरक्षक श्री. प्रथमेश हडपे, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन केले. वन विभागाने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवले असून, संपूर्ण परिसराची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे. तसेच, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांचे आदेश आणि उपाययोजना
घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावल वन विभागाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. मृत मुलाच्या कुटुंबीयांना त्वरीत 10 लाखाची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.तसेच उर्वरित 15 लाख रूपयाच्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे. तसेच गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात विशेष मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. यासाठी गावात दवंडी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता, त्याला जेरबंद करण्यासाठी अधिक गस्त आणि सापळे लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.