धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सोनवद रोडवरील दोन-तीन महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेले ९० लाख रुपयांचे शौचालय मागील पाच दिवसापासून बंद ठेवण्याची नामुष्की नगरपालिकेवर आली आहे. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत असुन त्यांना शौचास उघड्यावर बसावे लागतेय. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
धरणगाव नगरपालिकेत सत्तेत असलेले सत्ताधारी नगराध्यक्ष, नगरसेवक हे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे नाव बदनाम करत आहेत. त्यामुळे स्थानिक पालिकेतील पदाधिकारी धरणगावात पूर्णपणे दुर्लक्ष करत गावात कशा पध्दतीने शासकीय निधीचा अपव्यय करत आहेत, हे नागरीकांच्या आता लक्षात येत आहे.
सोनवद रोड परीसरातील नागरीकांनी बंद शौचालयाविषयी नागरिकांनी भाजपकडे तक्रार केली. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी हे शौचालयाची पाहणी करण्यासाठी पोहचले. त्याठिकाणी पुरुष शौचालय पाच दिवसापासून बंद आहे, अशी माहिती नागरीकांनी दिली. बंदचे कारण परीसरातील लोकांनी सांगितले की, लाईट बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालयाची बोरींग बंद असून पाण्याअभावी पुरुष शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. परंतु मुख्याधिकारी जनार्धन पवार यांना सर्व विषय माहीत असतांना देखील भाजपचे नगसेवक ललित येवले यांनी संपर्क केल्यावर मला याबाबत काहीही माहिती नाही, असे श्री. पवार यांनी सांगितले.
नगरपालिकेकडे लाइटबील भरण्यासाठी पैसे नाहीत तर एवढा खर्च करून शौचालय का बांधले?, यांचे उत्तर सत्तेचा लाभ घेत असलेल्या नगरसेवकांनी द्यावे. बंद असलेले पुरुष शौचालय लवकरात लवकर उघडावे अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल’असा इशारा भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, अनिल महाजन, रवी पाटील यांच्यासह भाजपच्या आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.