यावल (प्रतिनिधी) शहरातील एका बियर शॉपीवर आलेल्या चौघांनी बुधवारी सांयकाळी बनावट ५०० रुपयांची नोट चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानातील चालकाला संशय आल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी यात तिघांना ताब्यात घेतले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात असलेल्या एका बियर शॉपीत बियर घेण्यासाठी बुधवारी सांयकाळी रावेर तालुक्यातील रेंभोठा येथील श्रावण गंभीर महाजन, जळगावच्या आयोध्या नगरमधील राजेंद्र मुरलीधर पाटील, धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील नीलेश सुरेश पाटील व मध्य प्रदेशातील एक जण असे चौघे आले होते. या चौघांनी बियर घेतल्यानंतर दुकानदाराला ५०० रुपयांची नोट दिली.
दरम्यान, ही नोट नकली असल्याचे व्यवसायिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार अर्शद गवळी, न्याजोद्यीन तडवी, सांगळे असे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून त्या चौघांपैकी दोघांनी तेथून पळ काढला. तर इतर दोघांना व्यवसायिकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, पळ काढून फरार होण्याच्या बेतात असलेल्या दोघांपैकीला तिसऱ्याला पोलिसांनी पकडले.
या तिघांकडून ५०० रुपयांच्या ९७ हजार रुपये दराच्या १९४ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या जप्त करण्यात आलेल्या सर्व नकली नोटा भारतीय स्टेट बँकेच्या यावल शाखेच्या व्यवस्थापकांकडे सोपवण्यात आल्या आहेत. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करत आहे. तर फरार संशयित मध्य प्रदेशचा असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना केले आहे.