जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे अमिष दाखवत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विधवा महिलेवर जळगाव, धुळे, नाशिक येथे नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. महिलेने याबाबत पोलिसात तक्रार देण्याबाबत सांगितले असता, त्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पालकमंत्री माझ्या खिशात तर आमदारांना गोळ्या घालेल अशी धमकी दिल्याची ऑडीओ क्लिप आ. मंगेश चव्हाण यांनी सभागृहात ऐकवल्यानंतर खळबळ माजून गेली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महत्वाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी २०२३ मध्ये महिलेला एका गुन्ह्यासंबंधी मदत केली. त्यानंतर पीडित महिलेशी मैत्री करुन तिला लग्राचे अमिष दाखवून तिच्यासोबत जवळीक साधत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात अत्याचार करीत तिचे शोषण केले. त्यानंतर पीडित महिलेने संदीप पाटील यांची वरिष्ठांकडे तक्रार करेल असे सांगितले असता, संदीप पाटील यांनी महिलेला एसपी, आयजी, डीजी यांना मी घाबरत नाही, पालकमंत्री माझ्या खिशात आहे, आणि तू जर आमदाराकडे गेली तर त्यांना देखील गोळ्या घालून मारुन टाकेल अशी धमकीची कॉल रेकॉडींग आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ऐकवल्यानंतर एकच्च खळबळ माजून गेली होती.
आयुष नामक व्यक्ती पुरवित होता सेवा
शहरातील एक आयुष नामक व्यक्ती वारंवार त्या पीडित महिलेला फोन करीत होता, त्याच्या वाहनासह बनावट नावाचे सीमकार्ड पुरवून त्याद्वारे तो संपर्क करीत होता. तसेच पीडित महिलेला तो साहेब तुला फसवणार नाही, तो चांगला माणूस आहे असे म्हणत तो महिलेच्या संपर्कात होता. तसेच रात्री बे रात्री पोलिसांसोबत काही काम असेल तर आयूष नामक व्यक्तीसारखा दलाल पकडून त्याच्या माध्यमातून काम सांगितले जाते. अल्पवयीन मुली पळवून नेण्याबाबत गुन्हे दाखल होत असतांना त्यांचे लोकेशन आमदाराला मिळत नाही. मात्र त्यांचे लोकेशन हे त्या आयुष मणियारकडे असते. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी आ. चव्हाण यांनी बैठकीत केली.
आयुष मणियार यांना पिस्तूलचा परवाना देण्यात आला आहे. त्यांचा असा कोणता व्यवसाय आहे की, त्यांना पिस्तूलची गरज भासते, असा सवाल आमदार चव्हाण यांनी उपस्थित केला. संदीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात गुन्हेगारासारखीच वागणूक मिळावी, त्यांच्याविषयी सहानुभुती दाखवू नये, अशी मागणीही आमदार चव्हाण यांनी केली.
गुन्हा दाखलपुर्वीच संदीप पाटील पोलीस ठाण्यात हजर
आमदार चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर गुन्हा दाखल होण्यापुर्वीच पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे स्वतःहून पोलीस ठाण्यात पोहचले. त्यावेळी सुमारे दीड ते दोन तास पोलीस निरीक्षकांच्या दालनात बसून होते. आमदार चव्हाण हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर संदीप पाटील यांना दुसऱ्या खोलीत बसविण्यात आले. त्यावर संदीप पाटील यांनी हा गुन्हा मान्य केल्याची माहिती आ. चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मदत करणाऱ्या आयुष मणियारचे सीडीआर तपासण्याची मागणी देखील आ. चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली.
इतर महिलांनाही फसविल्याचा आरोप
तक्रारदार महिला दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर रात्रीपर्यंत तिचा जबाब घेवून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे हेदेखील पोलिस ठाण्यात थांबून होते. संदीप पाटील यानी अशा प्रकारे इतरही महिलांना फसविले आहे, अशी माहिती पीडीत महिलेने आपल्याला दिली असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. पीडीत महिलेने तक्रार केली असता, तिला हा प्रकार समजल्याचे तिचे म्हणणे असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रारी अर्ज दिला असून फिर्याद अद्याप दाखल करण्यात आलेली नाही.