जळगाव (प्रतिनिधी) : २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या क्रीडांगणावर “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. अवयवदानाबाबत जनजागृती करणे तसेच अवयवदाते आणि अवयव प्रत्यारोपण लाभार्थी यांच्या आरोग्य, जिद्द आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा सन्मान करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत सुमारे ४०० विद्यार्थी तसेच २० अवयवदाते व प्रत्यारोपण लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. दीपमाला काळे, एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, अधिष्ठाता (कॉमर्स व मॅनेजमेंट) प्रा. अनिल डोंगरे, तसेच मास-टेक कंट्रोल्स प्रा. लि.चे संचालक सुधीर चौधरी, मल्हार कम्युनिकेशनचे संचालक आनंद मल्हार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी अशा उपक्रमांमुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. महापौर सौ. दीपमाला काळे यांनी स्वतः भविष्यात अवयवदान करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात अवयवदान शपथ घेऊन करण्यात आली. त्यानंतर छोटेखानी मशाल रॅली काढण्यात आली. पुढे विद्यार्थ्यांसाठी ५ किमी व ३ किमी मॅरेथॉन, तसेच अवयवदाते व लाभार्थींसाठी १०० मीटर व २०० मीटर धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या.
अवयवदाते व लाभार्थी गटाच्या पुरुष विभागात १०० व २०० मीटर शर्यतीत वसीम पिंजारी (प्रथम), हर्ष शर्मा (द्वितीय) व प्रवीण आमोदकर (तृतीय) विजेते ठरले. महिला विभागात सायराबी हमीद पिंजारी (प्रथम), वर्षा झोपे (द्वितीय) व मनीषा पाटील (तृतीय) विजेत्या ठरल्या.
विद्यार्थी गटात मुलांच्या विभागात ५ किमी व ३ किमी स्पर्धेत अजय वसावे व जयपाक पावरा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलींच्या विभागात ५ किमी व ३ किमी स्पर्धेत मधुरा वसावे व जैदु बारेला यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धा नसून अवयवदानाच्या पवित्र कार्याला समाजात बळ देणारा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.
या उपक्रमाचे आयोजन किशोर सूर्यवंशी, छाया किडनी केअर अँड रिलीफ फाउंडेशन, डॉ. अमित भंगाळे (आनंद हॉस्पिटल व डायलेसिस युनिट), सुखकर्ता फाउंडेशन आणि क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स दिनेश पाटील, डॉ. अतुल बारेकर, सौ. लीना लेले, सोनल चव्हाण, निकिता चौधरी तसेच व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लीना लेले व सुभाष पवार यांनी केले.















