परभणी (वृत्तसंस्था) नवीन वर्षाच्या (New Year) पहिल्याच दिवशी परभणी (Parbhani) शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाची धारदार शस्त्राने हल्ला (Attack with sharpen weapon) करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात संबंधित तरुणाचा मृतदेह आढळला आहे. हत्येची ही थरारक घटना समोर येताच पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
नाविद असं हत्या झालेल्या १७ वर्षीय युवकाचं नाव असून तो शहरातील भोईगल्ली परिसरातील रहिवासी आहे. आज सकाळी परभणी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात नाविदचा मृतदेह आढळला आहे. नाविदचा मृतदेह स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या अधारे चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मृत नाविद याची नेमक्या कोणत्या कारणातून हत्या झाली? याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. चारही आरोपींची कसून चौकशी केली जात असून हत्येच्या नेमक्या कारणाचा तपास केला जात आहे.