धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. हर्षु अनिल कांबळे (वय ४, रा.धरणगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे.
अनिल कांबळे हे पत्नी, २ मुले व १ मुलगी हर्षु हिच्यासह धरणगावातील दादाजी नगर परिसरात वास्तव्यास होते. मजुरी काम करून कांबळे हे परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवार दि. २१ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता अमळनेर रस्त्यावर पांढरी विहीर परिसराजवळ अनिल कांबळे यांची पत्नी ह्या मुलगी हर्षुसोबत पायी चालत जात होत्या. त्याचवेळी नितीन रमेश पाटील (रा. साने नगर, अमळनेर ) हा आपल्या दुचाकी (क्र. एमएच १९ सीसी ७८१०) ने भरधाव वेगाने अमळनेरच्या दिशेने जात होता. दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याने थेट हर्षुला समोरून जोरदार धडक दिली. त्यात ती जबर जखमी झाली.
जखमी बालिकेला तात्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरु असताना हर्षुचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात नितीन पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद हे करीत आहेत.