धरणगाव (प्रतिनिधी) येथील चोपडा रोडवरील हॉटेल युक्ता बीअर बार व परमिट रूम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातून सीसीटीव्ही कॅमेरा, टीव्ही आणि दीड हजाराची रोकड, असा साधारण २० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
चोपडा रोडवरील हॉटेल युक्ता बीअर बार व परमिट रूम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. हॉटेलचे मालक गुलाब मराठे यांनी मंगळवारी रात्री नेहमी प्रमाणे हॉटेल साधारण १२ वाजेच्या सुमारास बंद केली. त्यानंतर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास हॉटेल उघडल्यानंतर चोरी झाल्याचे श्री. मराठी यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी भिंतीला असलेल्या गड्ड्यांच्या आतून हॉटेलमध्ये प्रवेश केला. भिंतीला लागून असलेला फ्रीज बाजूला सरकवल्यानंतर चोरटे थेट हॉटेलमध्ये शिरले. याठिकाणी चोरट्यांनी गल्ल्यातील साधारण दीड हजाराची रोकड चोरून नेली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा, टीव्ही लंपास केला. हॉटेल मालक गुलाब मराठे यांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध घेतल्यानंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स एका पाण्याच्या खड्ड्यात मिळून आला. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी हॉटेलमधील एकही मद्याच्या बाटली हात न लावण्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.