मुंबई (वृत्तसंस्था) पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणारे काँग्रेस नेते भाई जगताप यांना अमृता फडणवीस यांनी एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं न्हाय, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
नेहमीच ट्विटरवर चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ट्वीट करताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाचा आधारावर वर्ग केली होती. याच उत्तर द्यावं, असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्वीटमधील भाई जगतापांच्या एकेरी उल्लेखांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या,ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बँके ‘ ला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं नाही!
भाई जगताप काय म्हणाले होते?
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. ही टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.