मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा रादीनामा दिला आहे. नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे. त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली.
अशोक चव्हाण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील काँग्रसचे तीन आमदार जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभा मदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाणांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी रोजी अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे.