जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या प्रगतीला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली आहे. (Girish Mahajan’s Reaction On Budget 2023)
ना. गिरीश महाजन आजच्या यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलतांना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या सबका साथ, सबका विकास आणि आत्मनिर्भर भारत या दोन संकल्पावरच आज देशाच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आलेला आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा संतुलीत प्रयत्न करण्यात आलेला आहे. देशाचा कणा असणा-या कृषी क्षेत्रासाठी यंदा देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने एक कोटी शेतक-यांना नैसर्गिक शेतीसाठी प्राधान्य देण्याचे धोरण ठरविले असून यासाठी पीएम प्रमाण योजना उपयुक्त ठरणार आहे. तर डिजीटल प्लॅटफॉर्मही प्रगतीसाठी मदत करणार आहे. रेल्वेसाठी यंदा विक्रमी २ लाख ४० हजार कोटींची केलेली तरतूदही स्तुत्य आहे. तर देशात तब्बल १५७ नर्सींग कॉलेजचा शुभारंभ हा आरोग्य सेवेला बळकटी प्रदान करेल.
ना. गिरीशभाऊ पुढे म्हणाले की, गोरगरिबांना वर्षभर मोफत धान्याच्या योजनेला मिळाली मुदतवाढ ही सामाजिक न्यायासाठी उत्तम आहे. ग्रामविकासासाठी देखील यंदा भरीव तरतूद केलेली आहे. अर्थमंत्र्यांनी सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, वित्तीय क्षेत्र या सात मुद्यांवरून अर्थसंकल्प मांडला असून यामुळे देशाची ख-या अर्थाने चौफेर प्रगती होणार आहे. तर यंदा आयकर खात्याच्या स्लॅबमध्ये बहुप्रतिक्षित बदल करण्यात आल्यामुळे मध्यमवर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण, रेल्वे, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोक-या उपलब्ध होणार असून महिलांसाठी देखील अनेकविध कल्याणकारी योजना जाहीर झाल्या आहेत. या सर्व बाबी प्रगतीला पूरक असल्याचे मा.मंत्री श्री गिरीश महाजन म्हणाले.